महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘चला आरशात पाहू या’ अशा पद्धतीच्या पोस्टची एक मालिकाच त्यांनी समोर मांडली आहे. या माध्यमातून त्यांनी ठाकरे गटाला डिवचले. यामध्ये संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांचे अनेक जुने व्हिडिओ एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून समोर आणले आहेत.
संदीप देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांच्या एका सभेतील भाषणाचा काही भाग दाखवण्यात आला आहे. तर सोबत उद्धव ठाकरे यांचे नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो दाखवण्यात आले आहेत. “यावेळेला इकडे तिकडे कुठेही न पाहता, न फुटता, तुम्ही सगळ्यांनी हात वर करून एक मला विश्वास द्या की, नरेंद्रभाईंना आम्ही वचन देतो की, मुंबईतील सहापैकी सहा खासदार त्यांच्यासोबत आम्ही दिल्लीत पाठवणार. बस्स. नरेंद्रभाई तुम्हाला विश्वास दिला आहे. ही मुंबई आहे आणि मुंबईने एकदा ठरवले की, मागे हटत नाही. मुंबई संकटाला घाबरत नाही. मुंबई देशाचा आधार आहे. हा आधार, ही मुंबई, हा महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक हे आपल्या सोबत आहेत.”, असे उद्धव ठाकरे या व्हिडिओत सभेतील उपस्थितांना सांगताना दिसत आहेत.

संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंचे 2009, 2014,2019 आणि 2022 मधील काही वक्तव्य शेअर केले आहे. 2009 साली उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप चांगले आणि राष्ट्रवादीस काँग्रेस वाईट आहेत. 2014 साली म्हणाले, भाजप वाईट म्हणून युती तोडून वेगळे लढले आणि निवडणुकीनंतर परत भाजप चांगले. 2019 साली म्हणाले, विधानसभा लढताना भाजप चांगले, काँग्रेस- राष्ट्रवादी वाईट आणि निकालानंतर काँग्रेस- राष्ट्रवादी चांगले भाजप वाईट. आता 2022 साली म्हणतात, उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारे शिवसैनिक चांगले, शिंदेंना पाठिंबा देणारे शिवसैनिक वाईट.
