पुण्यात काँग्रेसमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते आणि पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काँग्रेस पक्षाने रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आबा बागुल पक्षावर नाराज नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर बागुल-फडणवीस भेटीला महत्त्व आहे. बागुल भाजपचा झेंडा हाती घेणार का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
आबा बागुल यांनी रविंद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यानंतर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पुण्यातील काँग्रेसचे जे पक्ष कार्यालय आहे ज्याला काँग्रेस भवन म्हणून ओळखले जाते तिथे त्यांनी आंदोलन देखील केले होते.आपल्यावर अन्याय झाला अशी भावना व्यक्त केली होती. तेव्हापासून कदाचीत त्या आधीपासूनच आबा बागुल हे भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. खासकरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. आज जी चर्चा प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र आहे.
पक्षातील एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवून बाहेरून आलेल्या व्यक्तीलाच पक्षात स्थान मिळणार असेल तर उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित करत लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बागुल यांनी आंदोलनदेखील केले होते. काँग्रेस भवन बाहेर काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र करून बागुल यांनी आपली नाराजी व्यक्त करत मूक आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे एकनिष्ठ, जुने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात सामना होणार आहे. मोहोळ यांच्यासमवेत कोरोना काळात त्यांनी महापौर म्हणून केलेल्या कामाचे वलय आहे, तर धंगेकर यांच्याबरोबर कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देताना दाखविलेला करिष्मा आहे. मात्र धंगेकरांच्या उमेदवारीनंतर पुण्यात काँग्रेसचे नाराजीनाट्य दिसून आलं होतं. त्यातूनच पुण्यातील राजकीय वर्तुळात आता ही मोठी घडामोड घडल्यासं दिसून येते.
