एकदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आणि जिंकणार अशी गर्जना दोन दिवसापूर्वी करणारे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आज महायुतीच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन प्रचारात सक्रिय होण्याबाबत मनधरणी केली.
प्रकाश आवाडे यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, रामदास कदम यांच्यासह पोहोचले. यावेळी प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा करत यांची मनधरणी केली. त्यामुळे आवाडे यांनी आपली तलवार म्यान केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकाश आवाडे यांना सोबत घेऊनच माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले. त्यामुळे एक प्रकारे मुख्यमंत्री शिंदे यांना हातकणंगले मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये झालेली कोंडी फोडण्यात यश आलं आहे.
हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी खासदार राजू शेट्टी स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून लढत आहेत. दरम्यान राजू शेट्टी यांनी महाविका आघाडी तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लढण्यास नकार दिल्याने. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर यांना संधी देण्यात आली आहे.
राहुल आवाडे यांनीच आमदार प्रकाश आवाडे हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरण्याची घोषणा त्यांनी केली होती. रविवारी ( 14 एप्रिल ) कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही आवाडेंनी सहकुटुंब भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राहुल आवाडे, त्यांच्या पत्नी मौसमी उपस्थित होत्या. बंद खोलीतील या चर्चेनंतरही आवाडे हे लढण्यावर ठाम आहेत. एवढेच नव्हे, तर ते मंगळवारी (ता. 16) अर्जही भरणार होते.मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाडे यांच्या घरी जात त्यांची मनधरणी करीत अखेर बंड मोडून काढलं आहे. त्यामुळे माने यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
