हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खर ठरला. मुंबई शहरातील गेल्या दहा वर्षांतील तापमानाचा उच्चांक नोंदवला गेला. मुंबईत गेल्या दहा वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूज केंद्रात सरासरी ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले तर ठाण्यात सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. या वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही लाई होत आहे.
मुंबईत गेल्या दहा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक उष्ण दिवसाची नोंद मंगळवारी झाली. मुंबईत मंगळवारी कमाल तापमान चार अंशानी अधिक नोंदले गेले. यापूर्वी २२ एप्रिल रोजी ३९ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. तो विक्रम मंगळवारी मोडीत निघाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ३ अंशानी अधिक होते. सांताक्रूझ केंद्रातील तापमानही सरासरीपेक्षा ६ अंशानी अधिक होते.
मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांत २५ एप्रिलपर्यंतच्या १० दिवसांमध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी गडगडाटासह किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे, अशी माहिती निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यांत, तसेच लगतच्या गोवा व गुजरात राज्यांत गुरुवारपर्यंत दमट हवेचा आणि उष्णतेचा अनुभव येऊ शकेल, असेही ते म्हणाले.
वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांनाही फटका बसू लागला आहे. मुंबईमध्ये १ एप्रिलपासून सुमारे १०० हून अधिक पक्षी व प्राण्यांना उन्हाचा त्रास झाला आहे. एप्रिल महिन्यात सरासरी रोज १० पक्षी रुग्णालयात दाखल केले जात आहेत. वाढत्या उन्हामुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होते. यामुळे झाडावरून किंवा उडताना अचानक खाली पडून जखमी होत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत.
राज्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे. तीन दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे पाच नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये धुळयामधील तीन तर ठाणे व सोलापूरमधील प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या ४२ दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे ७७ रुग्ण आढळून आले होते.
