संपूर्ण देशामध्ये रामनवमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. अयोध्येमध्ये राम मंदिराची स्थापना करण्यात आल्यानंतरही ही पहिलीच रामनवमी असल्याने अयोध्येतही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लाखोंच्या संख्येनं आज रामभक्त अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशातील नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही एका विशेष पोस्टच्या माध्यमातून रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छा देताना सूचक पद्धतीने राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे.
“भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम. भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली. ह्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
याशिवाय, “धर्म, राजकारण, ईश्वर यांची गल्लत हिंदूधर्मीयांकडून कधीच झाली नाही, आणि होणार देखील नाही. याचं कारण श्रीराम असोत भगवान श्रीकृष्ण की शंकर हे माणसाच्या मनातील आदर्शांची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीकं आहेत, ती धर्मप्रसाराची माध्यमं नव्हती. असो. पण आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना, आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा सर्वाना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा”, असे म्हणत राज ठाकरेंनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.
