अमरावती लोकसभेच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी आज ( बुधवार) शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. राणा यांना उमेदवारी देण्यास अडसूळ यांन टोकाचा विरोध केला होता. ही जागा शिवसेनेला मिळावी अशी त्यांची मागणी होती. जर नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा प्रचार करणार नाही असं अडसूळ पिता पुत्राने आधीच जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर राणा यांनी अडसूळांची भेट घेतली. या भेटीत अडसूळांनी राणांना काय आश्वासन दिलं याची चर्चा सध्या सुरू आहे.
आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. खरंच त्या पती पत्नीला अक्कल आहे की नाही, माझा प्रश्न आहे.नैतिकता नाही, अक्कल नाही.. आटापिटा करून मंडळींनी मला थांबविले आणि तिला उमेदवारी दिली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. गेल्यावेळी नवनीत राणा या राष्ट्रवादी , काँग्रेस सोबत होत्या. त्यांनी तिथेच थांबायचे होते.त्यांच्यात अडाणीपणा आहे. 17 रुपयांच्या साड्या वाटून त्यांची हवा निर्माण झाल्याचा टोला त्यांनी लगावला होता.
आनंदराव अडसूळ यांनी जातप्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून देखील राणा यांच्या विरोधात कायदेशीर लढाई देखील लढली होती. मात्र, हा निकाल राणा यांच्या बाजूनं लागला आणि त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळं राणा आणि अडसूळ यांच्यात कमालीची कटुता होती. त्यानंतरही राणा दाम्पत्य आज अडसूळ यांच्या घरी पोहोचलं.
या भेटीनंतर अभिजीत अडसुळांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. “राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो किंवा कायमचा मित्र नसतो. ही लढाई देशाच्या पंतप्रधानांसाठी चालू आहे. ४०० पारचा आकडा आपण निश्चित केला आहे. मोदींसाठी सगळे लढण्यासाठी तयार आहेत. यासंदर्भात आम्ही चर्चा करू आणि त्यातून काहीतरी सकारात्मक येईल”, असं अभिजीत अडसूळ माध्यमांना म्हणाले.
महायुती म्हणून आम्ही सर्व एक आहोत अशी प्रतिक्रीया भेटीनंतर आमदार रवी राणा यांनी दिली. मोदींनी चारशे पारचे लक्ष ठेवले आहे. ते पुर्ण करण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार असल्याचेही ते म्हणाले. शिवाय आनंदराव अडसूळांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो होते. राजकारणात कायम कोणी शत्रू नाही किंवा मित्रही नाही असेही ते म्हणाले. दरम्यान या भेटीनंतर तरी अडसूळांची नारीज दुर होईल आणि ते प्रचारात सक्रीय होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राणा दाम्पत्याने अचानकपणे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची भेट घेतल्याने अमरावतीमधील राजकीय वातावरण पुर्णतः बदललेले आहे.
