लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली तरी महाविकासआघाडीमधला सांगलीच्या जागेचा वाद संपला नाही. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रसेचे नेते विशाल पाटील यांनी सांगलीत भव्य शक्तीप्रदर्शन केलंय. अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांनी सभेतून भूमिका मांडली. काँग्रेस पक्ष आणि काही घराणे राजकारणातून संपवण्याचा काहीजण प्रयत्न करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. आपण अजूनही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम असल्याचेही विशाल पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांनी भूमिका मांडली आहे.
सत्यजीत तांबेंनी ट्विट करून विशाल पाटलांच्या बंडाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, विशाल पाटलांवर काय अन्याय झाला, हे फक्त त्यांचा संघर्ष माहीत असलेल्या लोकांनाच समजेल. त्यातूनच त्यांना हे पाऊल उचलावे लागले. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत. वसंतदादा पाटलांचे या महाराष्ट्रावर आणि आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत. त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजीनियर तयार होत आहेत. त्यांचा हा वारसा विशाल हे पुढे घेऊन जाण्यात सक्षम आहेत. त्यामुळेच त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे, असेही तांबे म्हणाले.
सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी पक्षाच्या आदेशाविरोधात जात अपक्ष उमेदवार अर्ज भरला होता. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली होती. या निवडणुकीत सत्यजित तांबे निवडून आले होते आणि त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली होती. त्यानंतर सत्यजित तांबे महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे चर्चेत नव्हते. मात्र, आता सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा देत पु्न्हा एकदा काँग्रस नेतृत्त्वाविरोधात शड्डू ठोकला आहे.
दरम्यान, विशाल पाटलांच्या बंडाचे महाविकास आघाडीतून टीका होत आहे. त्यांच्या बंडाबाबत काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, हा मतदारसंघ काँग्रेसला हवा होता. त्याबाबत स्थानिक पदाधिकारी विशेष आग्रही होते. वरिष्ठ पातळीवरही काँग्रेसने या जागेची मागणी केली होती. मात्र, शिवसेनेने या जागेचा आग्रह धरला. त्यामुळे सध्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आमची वारंवार चर्चा झाली. यातून मार्ग निघेल याबाबत आम्ही आशावादी आहोत. तसेच विशाल पाटील यांना पक्षाने एबी फॉर्म दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
