सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी आढळून आली असून ती त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे. याच मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहूल गायकवाड यांच्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
माढा व सोलापूर या दोन्ही मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली असून १९ एप्रिलपर्यंत शेवटची मुदत आहे. दाखल अर्जांची छाननी २० एप्रिलला होणार असून २२ एप्रिल रोजी अर्ज माघार घेता येणार आहेत. दरम्यान, ज्या उमेदवारांच्या अर्जात त्रुटी राहिल्या आहेत, त्यांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत किंवा अर्जांच्या छाननीपर्यंत (संबंधित बाबींनुसार) पूर्तता करण्यासाठी वेळ दिला जातो.
राहुल गायकवाड यांनी दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र आयोगाच्या नमुन्यात नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने उमेदवाराला पत्राद्वारे कळवले आहे. दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या अर्जतील एका पानावर स्वाक्षरी राहिली होती.ही बाब फार गंभीर नाही, त्यांना पुढील तीन दिवसांत ती स्वाक्षरी करावी लागणार आहे. अर्जाच्या छाननीपर्यंत त्रुटीची पूर्तता करण्यासाठी उमेदवारांना वेळ देण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या प्रति आयोगाच्या नमुन्यात नाहीत, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. माढ्यातील उमेदवारांचे अर्ज अचूक असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.
