बारामतीत इतिहास घडेल, सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू झाला आहे. केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला. यानिमित्त आयोजित प्रचार सभेत उपस्थित मान्यवरांनी सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बारामतीत इतिहास घडेल, सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील. बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच केला आहे. बारामतीला आणि वहिनींना कुणीच थांबवू शकत नाही. नवीन इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील. अजित पवारांनी बारामतीसाठी मेहनत घेतली आहे. बारामतीच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अजित पवारांनी मागील 25 वर्ष बारामतीचा विकास केला. त्यासाठी भरपूर मेहनत घेतली.”ही निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी ही लढाई नाही आहे. ही लढाई देशाचा नेता निवडण्याची लढाई आहे. देशाचा नेता कोण होईल आणि कोणाच्या हाती देश देऊ, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील 25 वर्षं अजित पवार यांनी बारामतीचा विकास केला. त्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. आज बारामतीचे जे रूप आहे हे अजित पवार यांच्यामुळे आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. बारामतीचा फैसला या सभेनेच केला आहे. आता आपल्याला केवळ घरोघरी पोहाेचून मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणायचे आहे. सुनेत्राताई या कोणी बाहेरच्या नाहीत तर बारामतीकरांच्या मनातील सूनबाई आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये बारामतीत मोठे काम केले आहे. त्यामुळे बारामतीकरांच्या मनातील सूनबाई निश्चितपणे दिल्लीला जातील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला.

यंदाची निवडणूक लढताना मोदी म्हणाले की, मागचे 10 वर्ष फक्त ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है,. पुढच्या पाच वर्षात बदललेला भारत आपण पाहिला आहे. यंदाच्या 400 पारमध्ये बारामतीचा लोकप्रतिनिधी पाठवला तर मोदींना मोठी मदत मिळेल म्हणून सुनेत्रा पवारांना मतदान केलं पाहिजे, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.