सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर आता आज महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे सुद्धा आज विराट शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजे यांच्या शक्ती प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे शक्तिप्रदर्शन जोरदार होण्यासाठी उदयनराजे यांनी खास करून बैठक आयोजित केली होती. यामध्ये जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मीच उमेदवार असे म्हणत आपला प्रचार सुरू केला आहे. भाजपच्या केंद्रीय सुकाणू समितीने उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा केली आहे .आज खासदार उदयनराजे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे . समर्थकांनी याची जोरदार तयारी केली आहे . गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जावली विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांना पाचरण करून जबाबदारी निश्चित करून दिली आहे.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
बारामातीमध्ये सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार
राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्या तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना तिकीट देण्यात आलं आहे.आज सुनेत्रा पवार मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
