कुठल्या गोष्टीत ‘ध चा मा’ करु नये; निधी देतो, कचाकचा बटण दाबाच्या वक्तव्यावर अजित पवार यांचं स्पष्टीकरण

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सुनेत्रा पवारांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेही आजच उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी आज सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांबरोबर पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये गणपतीची आरती केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी नुकत्याच इंदापूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या ‘लोकसभा निवडणुकीला बटण कचाकचा दाबा, तुम्हाला निधी पाहिजे तेवढा देतो’ या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.

दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये दर्शनानंतर अजित पवार यांना गणपती बाप्पांकडे काय मागितलं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर यश, विजय देवाकडे मागितला असं अजित पवार म्हणाले. “महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणूका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात, यासाठी गणरायाने आशिर्वाद द्यावेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार, त्यासाठी महाराष्ट्रातून महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, अशी प्रार्थना दगडूशेठ गणपतीच्या चरणी केल्याच” अजित पवार म्हणाले.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोणत्याही गोष्टीत ध चा मा करू नये. मी गंमतीने हसत हसत तिथे बोलत होतो. तिथे सर्वजण वकिल आणि डॉक्टर होते. ती जाहीरसभा नव्हती. ती मर्यादित लोकांची, सुशिक्षित वर्गाची सभा होती. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे मान्यवर तेथे हजर होते.

आज उमेदवारी अर्ज भरणं म्हणजे शक्ती प्रदर्शन नाही. जास्तीत जास्त महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित रहायच हे ठरलय. हा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगली, साताऱ्याला जाणार. उद्या धाराशिवला जाणार. शक्ती प्रदर्शन वैगेरे काही नाही. अर्ज भरताना उपस्थित राहण्याच आवाहन केलय. फॉर्म भरल्यानंतर सभा होईल. त्यानंतर नेते आपआपल्या कार्यक्रमाला जातील असं अजित पवार म्हणाले.

कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी बैठक घेतल्यावरुन प्रश्न विचारण्यात आला असता. “मी काल रात्री 9 वाजता गेलो आणि 10.30 ला मी तिथून बाहेर पडतो. त्यांची बैठक बराच वेळ चालली. भाजपा महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून फडणवीस काम करतात. मला आणि त्यांना काही गोष्टींवर बोलायचं होतं. त्यासाठी आम्ही एकत्र चर्चेला बसलो होतो,” असं अजित पवारांनी सांगितलं.