तुम्हाला कारखाना चालवतो येत नाही आणि खासदार व्हायला निघाला; अजित पवारांचा विशाल पाटलांना टोला

वसंतदादांनी चांगले कारखाने काढले. महाराष्ट्रात फिरत असताना आम्ही सांगलीच्या कारखान्याचे उदाहरण देत होतो; पण कारखान्याचे वाटोळे कुणी केले. तुमच्यात धमक नाही. बँकेची स्थिती काय, असा सवाल करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाल पाटील यांना लक्ष्य करत ‘तुम्हाला कारखाना चालवता येत नाही अन् निघालाय खासदार व्हायला’ असा टोला हाणला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ही निवडणूक देश कोणाच्या ताब्यात द्यायचा हे ठरविणारी आहे. ग्रामपंचायत, सोसायटी, खरेदी विक्री संघ अथवा जिल्हा परिषद, महापालिका यांची ही निवडणूक नसून देशातील १४० कोटींचे नेतृत्व ठरवणारी ही निवडणूक आहे. यामुळे जबाबदारीने वागले पाहिजे. देशाच्या विकासाचा आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. गेल्या दहा वर्षात केवळ देशातच नव्हे तर जगात देशाला मानसन्मान देण्याबरोबरच समाजातील विविध घटकांची प्रगती साधण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.

सांगली भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

उपमुख्यमंत्री फडणवीस या वेळी बोलताना म्हणाले, गेल्या दहा वर्षाचा मोदी सरकारचा कारभार म्हणजे एक ट्रेलर होता, यापुढे पिक्चर आहे. भरलेले ताट आता सामान्य माणसापुढे येणार आहे. एनडीएचे इंजिन नरेंद्र मोदी असून बाकी सर्व डबे आहेत. या डब्यात सामान्य माणसाला स्थान आहे. मात्र, विरोधकांकडे केवळ इंजिनच आहे. प्रत्येक नेता स्वत:ला इंजिन समजत असल्याने सामान्य माणसाला यामध्ये स्थानच नाही. नरेंद्र मोदींच्या धोरणामुळे देशातील कारखानदारी जिवंत राहिली आणि शेतकऱ्यांना एफआरपीसुद्धा मिळाली. विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक होत असून मोदींना आणि खासदार संजयकाका पाटील यांना तिसर्‍यांदा संधी देण्यासाठी सांगलीकर प्रामाणिक प्रयत्न करतील असा विश्‍वास वाटतो.