उदयनराजेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा; कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा

सातारा लोकसभा निवडणूक २०२४ साठी या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याकडून जोरदारपणे प्रचार केला जात आहे. त्यांच्या प्रचारासाठी राज्यातील भाजपमधील अनेक दिग्गज उपस्थिती लावणार असून त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराडमध्ये येत्या मंगळवार, दि. ३० एप्रिल रोजी भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे अशी सरळ लढत होत आहे. दोन्ही बाजूकडून स्टार प्रचारकांसह दिग्गज नेत्यांच्या सभांचे जोरदार नियोजन सुरु आहे. भाजपच्या वतीने उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन केले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक सहप्रभारी निर्मलकुमार सुराणा यांनी शुक्रवारी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कोअर कमिटीचे बैठक घेतली. भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कराड दक्षिण भाजप कोअर कमिटीतील पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निर्मलकुमार सुराणा यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच या अनुषंगाने कोअर कमिटी पदाधिकारी, सदस्यांना काही सूचना केल्या.

कराड येथे होणाऱ्या या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले असून मोदींची ही सभा टोलेजंग होण्याच्या द़ृष्टीने व्यापक नियोजन केले जात आहे. सुमारे 20 एकर जागेवर ही सभा होणार आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराला आणखी वेग आला आहे. खा. उदयनराजे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी यासाठी अतुल भोसले प्रयत्नशील होते. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोदींच्या सभेचे नियोजन करण्यासाठी पाठपुरावा केला.