दुसऱ्या टप्प्यासाठी आज संपणार प्रचार, आठ मतदारसंघात २६ एप्रिलला मतदान

दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आज संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार संपेल. यानंतर २६ एप्रिलला १३ राज्यांतील ८८ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या जागांचे निकालही एकत्रित ४ जूनला जाहीर केले जातील. मतदान शांततेत आणि निष्पक्षपणे व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली आहे.दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यासाठी मतदानासाठी नाव मागे घेण्याची तारीख गेल्याने एकूण उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मेला १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधील ९५ जागांसाठी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम या पाच तर, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी अशा आठ लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदानाच्या ४८ तास अगोदर निवडणूक जाहीर प्रचार संपत असल्याने बुधवारचा दिवस राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने शेवटच्या तासातील प्रचाराचे नियोजन केले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भंडारा येथे सभा घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या अमरावती आणि सोलापूर येथे सभा होतील.

अमरावती लोकसभा मतदारसंघासह गेल्या पंधरा दिवसांमध्ये प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडल्या. येत्या 26 एप्रिलला दुस-या टप्प्यातील मतदान आहे. यामध्ये हिंगाेली, वर्धासह पश्चिम विदर्भातील यवतमाळ – वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. परिणामी आज (बुधवार) सायंकाळी सहा नंतर आठ मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. वर्धा लाेकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध एनसीपी शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात लढत हाेणार आहे. तडस यांच्या प्रचारार्थ आज वर्धा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा हाेणार आहे.