‘पश्चिम महाराष्ट्र हा शिव,शाहू आणि फुले यांच्या विचाराने मंतरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे केले, महात्मा फुले आणि शाहू महाराजांनी वंचितांच्या बाजूने लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा समतेचा मार्ग स्वीकारून तळागाळातील माणसासाठी लढत राहिले. पण आता या महान व्यक्तींचं नाव घेणारी माणसं आता कुठे आहेत? असा सवाल रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी करत “आत्ताची लढाई आहे ती वाडा विरुद्ध गाववाडा अशी आहे,” असा हल्लाबोल महाविकासआघाडीच्या उमेदवारांवर केली.
लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरूवात झाली असून प्रचारसभांनाही वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपांचेही राजकारण या काळात सुरूच आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ‘ गेल्या 70 वर्षाच्या राजकारणात महाराष्ट्रात मूठभर सरदारांचे राजे होते. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवणारे देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील आघाडी सरकारची सत्ता देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता उलथवून टाकली. त्यामुळेच शरद पवार यांना फडणवीस यांची जात काढावी लागली असा आरोप त्यांनी केला’.
देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांना तगडं आव्हान देताहेत. असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागले. एकच बाप असा भेटला तो शरद पवारांना पुरून उरला, म्हणून पवारांना खोटे बोलून रेटून चालावं लागत आहे अशी टीकाही त्यांनी केली.27 एप्रिल ला कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. पुन्हा एकदा ही जनता पंतप्रधान मोदी यांच्या पाठीमागे उभी राहील. ही लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. इंडिया मध्ये असणारे नेते हे सर्व लुटारू आणि अलीबाबाचे साथीदार आहेत, असे टीकास्त्र खोत यांनी चढवले. पंतप्रधान मोदी हे भारतातील अठरापगड जातीला सोबत घेऊन जातात , त्यामुळे इंडिया आघाडीच्या लुटारूंना महायुती मूठ माती देईल असेही ते म्हणाले.
सदाभाऊ खोत सत्तेबाबत बाेलताना म्हणाले मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. चळवळीतले सर्व चढ उतार पाहिले. कधी मी आमदार, मंत्री होईन असं वाटलं नव्हतं. आमदारांमध्ये असणार वातावरण पाहता आलं. मंत्री काळातील शिवार पाहता आलं. शेती भातातलं शिवार बघितलं. आमदारकीचे शिवार बघितलं, मंत्रीपदाचा शिवार बघितलं, मग माझ्या लक्षात आलं शेताभातातल्या शिवारामध्ये उन्हाळा असतो, हिवाळा असतो, पावसाळा असतो.
