महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे कोल्हापुरचे राजे छत्रपती शाहू महाराज हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात संजय मंडलिक यांना पुन्हा महायुतीकडून शिवसेना शिंदे गटान उमेदवारी दिली आहे. ज्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मविआने तर छत्रपतींना विजयी करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. पण दुसरीकडे मात्र, भाजपाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यामधील शाब्दिक वाद वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे.
सतेज पाटील यांना निवडणुकीचा निकाल लक्षात आलेला आहे. निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ते वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसत आहेत. त्यांचा उमेदवारी संदर्भातला जो प्लॅन होता. तो फेल झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्याचं दिसत आहे. शाहू महाराजांबद्दल आदर पण महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. कुणी कुणाच्या आडवं जायचं कारण नाही लोकशाही आहे. सतेज पाटील वक्तव्य करत आहे की आमच्या आडवं येऊ नका. कोण कोणाच्या आडवं जात आहे?, प्रतिप्रश्न धनंजय महाडिक यांनी केलाय.
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी “रात्री बारा वाजता काठी घेऊन येऊ या…” असे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा आता खासदार धनंजय महाडिक यांनी समाचार घेतला आहे. सतेज पाटील यांना कोल्हापुरात दंगल घडवायची आहे का?, असा सवाल करत महाडिक यांनी पाटलांवर निशाणा साधत म्हटले की, सतेज पाटील विसरलेत की ते गृहमंत्री नाहीत. आता त्यांनी सांभाळून बोलले पाहिजे. आता आमचे सरकार आहे. ते गृहमंत्री नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी जाहीर वक्तव्य करू नयेत, असा सल्लाच महाडिकांकडून देण्यात आला आहे.
त्यांचा तो नेहमीचा फॉर्मुला आहे आपल्या हातातून यश निश्चित नसेल तर अशा पद्धतीने एखादं स्टंट करायचं आणि लोकांचा अट्रॅक्शन मिळवायचं. गृहमंत्री असताना ते सोडणार नाही उचलून आणतो ही भाषा ते वापरायचे.कोल्हापूरकरांना माहिती आहे ते घाबरलेले आहेत. या आधी सुद्धा बिंदू चौक मध्ये त्यांनी अंमल महाडिक यांना आव्हान दिलं होतं ते आले नाहीत. कोणीही भाजप कार्यकर्ता त्यांच्या आडवं जाण्याचा प्रश्नच नाही. अशा शब्दात महाडिक यांनी सुनावले आहे.
येत्या 27 एप्रिलला नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी पाच वाजता तपोवन मैदानात ही सभा होणार आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी ही माहिती दिली आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत.
