कार्यकर्त्यांना धक्का लावला तर कोणाच्या बापाला ऐकत नाही, अजितदादांचा विरोधकांना इशारा

“रोज भाषण करुन आणि उणीधुणी काढून लोकांचा रोजी रोटीचा प्रश्न मिटणार नाही. लोकांचा विकास करण्यासाठी आम्ही सत्तेत सामील झालोय. आपल्या खासदाराने कसलाही निधी आणला नाही. देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी होणार आहेत. बारामती सारखा इंदापूरचा विकास करायचा आहे”, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते इंदापुरातील प्रचार सभेत बोलत होते.

‘काही लोक दमदाटी करत आहेत. पण, तुम्ही घाबरू नका, माझ्या कार्यकर्त्यांना धक्का लावला. तर, मी कोणाच्या बापाचेही ऐकत नाही, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरच्या सभेतून विरोधकांना दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत नणंद आणि भावजय निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार म्हणाले, काही जण वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला दमदाटी करत आहेत. तुम्ही घाबरू नका. त्यातमध्ये कुठली बँक असो, कुठली सोसायटी असो, कुठलाही सचिव असो, मी सांगतो की, कोणी घाबरू नका, मी आहे. कोणाच्या मनगटात किती जोर आहे, हे अजित पवारला चांगला माहिती आहे. एखाद्यांनी माझ्या कार्यकर्त्याला धक्का लावला जर तिथे काही तरी गडबड केली. तर, मी कोणाच्या बापाचे ऐकत नाही, असा इशारा अजित पवार यांनी विरोधकांना दिला आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आजपर्यंत घटनेत दुरुस्ती 106 वेळ झाली. काँग्रेसने 85 वेळा घटनेत दुरुस्त केल्या. सर्व आमदार इच्छुक आमच्याकडे आले आहेत. त्यामुळे आमदार काम करतो म्हणून काहीजण दुसरीकडे गेले आहेत. जाती-पाती आणि नात्यागोत्याचा कधीही विचार न करता सर्वांची कामे होण्यासाठी कायमस्वरूपी तत्पर राहणार आहे.