राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यभरात प्रचार सभांचा, रॅलींचा धडाका सुरू आहे. अशातच कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राज्यभर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचारार्थ रोहित पवार यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. अशातच रोहित पवार यांना कर्जत जामखेडमध्ये मोठा धक्का बसला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर मतदारांचे मोठं प्राबल्य असल्याने दोन्ही पवारांकडून धनगर नेत्यांना मानाचं पान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला शरद पवार यांनी अहिल्याबाई होळकर यांचे वंशज असलेले भूषणसिंहराजे होळकर यांना पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर आता अजित पवार यांनी देखील अहिल्याबाई होळकर यांचे वंशज असलेले अक्षय शिंदे यांना पक्षात प्रवेश देत थेट राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
अक्षय शिंदे हे मूळचे चौंडी येथील असून रोहित पवार यांचे कट्टर समर्थक होते. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अक्षय शिंदे यांनी रोहित पवार यांना कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. रोहित पवार यांच्या विजयात अक्षय शिंदे यांचा मोठा वाटा होता.मात्र काही दिवसांपासून रोहित पवार आणि अक्षय शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर आता त्यांनी अजित दादांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
अक्षय शिंदे हे धनगर समाजातील एक मोठे नेतृत्व म्हणून संपूर्ण नगर जिल्ह्याला परिचित आहेत. धनगर समाजातील युवकांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव असून त्याचा फायदा अजित पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात देखील होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे धनगर समाजातील नेत्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी दोन्ही पवारांमध्ये चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे.
