तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा; पुण्यातील अकार्यश्रम नगरसेवकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडसावले

‘पुणे, बारामती आणि शिरूर मतदारसंघांतील महायुतीचे तिन्हीही उमेदवार निवडून आले पाहिजेत. जो काम करेल, ज्याचा निकाल चांगला आहे, त्यांच्या पाठिशी मी आहे. शिरूर, बारामती; तसेच मावळमध्ये ‘कमळ’ नव्हते म्हणून मित्रपक्षांचे चिन्ह पोहोचले नाही, अशी तक्रार नको आहे. पुण्यातील उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आला पाहिजे. कोणीही हलगर्जीपणा करता कामा नये. तुम्हा सगळ्यांवर माझी नजर असून, सगळ्यांचे ‘ऑडिट’ होणार,’ असा दम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांना आज पुण्यात दिला.

शहराच्या मध्यवस्तीतील एका हॉटेलमध्ये नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी झाडून महापालिकेचे माजी नगरसेवक उपस्थित होते. जे दोन-तीन नगरसेवक अनुपस्थित होते, ते का उपस्थित नाहीत, याची माहितीही फडणवीस यांनी या वेळी घेतली. या बैठकीसाठी फडणवीस यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ, उमेदवार प्रतिनिधी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह ९०हून अधिक माजी नगरसेवकांची उपस्थिती होती.

पुणे लोकसभा मतदारसंघातील काही नगरसेवकांनी प्रचाराच्या वेळेस केलेल्या हलगर्जीपणाविषयी फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘या प्रचारामध्ये माझे सर्वांवर करडी नजर आहे. त्यासाठी आपली स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे. कोण काय करत आहे, याची थेट माहिती मला मिळत आहे. प्रचारामध्ये छोट्या सभा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. अगदी १५ ते २० नागरिकांना एकत्र करून त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेणे महत्वाचे आहे. अशा लहान- मोठ्या सभांचा फायदा नागपूर मध्ये उत्तम झाला आहे. नागपुरात लहान-मोठ्या सभांतून नऊ लाख नागरिकांपर्यंत थेट पोहोचता आल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पुण्यात देखील अशाच प्रकारे लहान-मोठ्या सभेतून प्रचार आवश्यक आहे. पुढील आठवडाभरात मोठ्या संख्येने अशा सभा पार पाडायला हव्यात,’ अशी अपेक्षा त्यांनी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांकडून असल्याचे सांगितले. या सर्व गोष्टी करत असताना कोणाला काही अडचण असेल, तर त्या सोडविण्यासाठी याठिकाणी चंद्रकांत पाटील असल्याचे सांगितले. परंतु, कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघातील काम व्यवस्थित करायचे आहे, असे म्हणत फडणवीस यांनी यावेळी नगरसेवकांना खडसावले.