लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. त्यातच शिवसेनेच्या नेत्या निलम गोरे यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.गोरे यांनी स्वप्ना पाटकर यांचे निवेदन वाचून दाखवले आहे. यात संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
स्वप्ना पाटकर ह्या मुंबईतील सांताक्रुज परिसरात राहत असून पत्रा चाळ घोटाळा प्रकरणातही त्यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध जबाब दिला होता. तर, खासदार राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी एका महिलेला फोनवरुन धमकीवजा शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलं होतं, ते प्रकरण स्वप्ना पाटकर यांच्याशीच संबंधित असल्याचंही समोर आलं आहे. त्यातच, आज नीलम गोऱ्हे यांनी स्वप्ना पाटकर यांची बाजू मांडताना पत्रकार परिषदेतून संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. तर, थेट उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन, याप्रकरणाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचं नीलम गोऱ्हेंनी म्हटलं आहे.
मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांना याबाबत माहिती दिली, तसेच स्वप्ना पाटकर यांचं म्हणणं ऐकून घ्या, असे म्हटले होत. तसेच, संजय राऊत यांनाही त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याबाबत बोलले होते. मात्र, त्यावर त्यांनी मलाच प्रश्न केला की, तुम्ही हे प्रकरण घेऊन माझ्याकडे आलातच का? असा गौप्यस्फोटही नीलम गोऱ्हेंनी केला आहे. गोऱ्हे यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन हकीकत सांगितली. दरम्यान, या पत्रकार परिषदेतून स्वप्ना पाटकर यांनी मांडलेलं नीलम गोऱ्हेंकडे केलेल्या तक्रारीची प्रतही वाचून दाखवली आहे. तसेच, ह्या तक्रारी मुख्यमंत्री, गृहमंत्री, महिला आयोग आणि माझ्याकडेही त्यांनी दिल्याचं गोऱ्हेंनी सांगितलं आहे.
निलम गोरे यांनी स्वप्ना पाटकर यांचे कथित निवेदन वाचून दाखवले. त्यात असा उल्लेख आहे की, मी स्वप्ना पाटकर आई सोबत सांताक्रुझ येथे रहाते. संजय राऊत माझा आणि माझ्या कुटुंबाचा छळ करत आहे. आतापर्यंत हजारो पत्रं लिहिली तरी मला त्रास होतो आहे. जिथे जाते तिथे माझा पाठलाग होतो. ३ मे ला देखील माझा बीकेसी येथे पाठलाग झाला. याआधी देखील माझ्यावर हल्ला झाला आहे. गुन्हा दाखल आहे पण पुढे काहीच झालं नाही.
पुढे यात असा उल्लेख आहे की, संजय राऊत यांनी माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्टार गुप्तहेर नेमले आहेत. एकाला अटक देखील झाली पण संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली नाही. व्यंकटेशची संजय राऊत यांनी हत्या केली असू शकते. संजय राऊत यांनी मला धमकी दिली शिवीगाळ केली पण कारवाई झाली नाही. संजय राऊत यांना पोलीस ठाण्यात बोलावले जात नाही. दुबई आणि पाकिस्तानातून धमकीचे कॉल आले.गाडीवर हल्ला करून धमकी देण्यात आले . घरावर दारूच्या बाटल्या फेकल्या.
कोणी सापडले नाही असे सांगून प्रकरणे बाजूला ठेवण्यात आली. माझ्या कोणत्याही प्रकरणात मुंबई पोलिसांना काहीच सापडले नाही हे कसे शक्य आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. (FIR 239/2013 Mahim Poice Station, FIR 324/2013 Vakola Police Station) संजय राऊत यांनी मला फॉलो करण्यासाठी आणि माझा ठावठिकाणा शोधण्यासाठी स्टार सुरक्षा गुप्तहेर नियुक्त केले होते. मी कुठे आणि कोणासोबत आहे हे सांगणारे राऊतचे ईमेल आणि मेसेज मला यायचे. त्याची तक्रार केली होती. पण त्यावर माझी तक्रार नोंदवली गेली नाही, असेही पाटकर यांनी म्हटले आहे.
