बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर आरोग्य साहित्य वाटप

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ७ मे रोजी होणार असून वाढता उन्हाळा लक्षात घेता निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणा-या मतदारांसाठी १ हजार ७२४ प्रथमोपचार पेट्या आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी १० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण जिल्हा प्रशासनाने केले.मतदान केंद्रावर काही दुर्घटना उद्भवल्यास प्राथमिक उपचार देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड विधानसभा मतदार संघासाठी २३२, इंदापूर २५२, बारामती २८०, पुरंदर २४४, भोर ५२५ व खडकवासला १९१ याप्रमाणे १ हजार ७२४ कीटचे वितरण केले.

बारामती लोकसभा मतदासंघाअंतर्गत विधानसभा मतदारसंघनिहाय महिला, दिव्यांग, युवा, वैशिष्ट्यपूर्ण (युनिक) आणि आदर्श अशा मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून आवश्यक सुविधांनी युक्त ही मतदान केंद्रे मतदारांच्या स्वागतासाठी आणि मतदानासाठी सज्ज करण्यात आली आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अशी वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली असून महिला संचलित मतदान केंद्रांवर सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी, सुरक्षेसाठी नियुक्त पोलीस असे सर्वच महिला कर्मचारी आहेत. दिव्यांग संचलित मतदान केंद्रांवर सर्व कर्मचारी दिव्यांग आहेत. युवा संचलित मतदान केंद्रावर सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी युवा वयोगटातील आहेत. आदर्श मतदान केंद्रावर सर्व सेवासुविधा तसेच आवश्यक त्या अतिरिक्त सुविधा देण्यात येतात. युनिक मतदान केंद्रे ही वेगवेगळ्या संकल्पनेवर (थीम) सजविण्यात येणार आहेत.

बारामतीसाठीचा प्रचार रविवारी सायंकाळी सहा वाजता संपला. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी शहराच्या बाहेर नाक्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे; तसेच पैसे, दारूचे वाटप होणार नाही यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. मंगल कार्यालयांसह हॉटेलमध्ये होणाऱ्या पार्ट्यांवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मतदारसंघातून १८ लाखांची रक्कम आणि सुमारे ९७ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान ७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार असून स्वीकृतीचे कामही वडगाव बुद्रुक येथील स्प्रिंग डेल स्कूलच्या मैदानात होणार आहे.

साहित्य वाटप करण्याकरीता व स्वीकृतीसाठी १०० कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे. साहित्य वाटपासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून ५३ टेबलद्वारे मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप कामकाजाला सुरुवात केली. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबतची नोंद साहित्य वाटप नोंदवहीत घेण्यात आली.