दिघेसाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला प्रश्न होता, ‘दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे?’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अनेक मोठमोठे नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराकरता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात पोहोचले. यावेळेस त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. दिघेसाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी सगळ्यात पहिला प्रश्न त्यांच्या प्रॉपर्टीविषयी विचारला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. शिवाय ठाकरे आपल्याला आनंद दिघेंवर सिनेमा काढू देत नव्हते, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आनंद दिघे यांचे निधन झाल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न होता की, दिघे यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? ते ऐकून मला वाटलं की, आपण चुकीच्या जागी आलो. उद्धव ठाकरे मला दिघे साहेबांचा सिनेमाही काढून देत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांचा सिनेमा निघाल्यानंतर दिघे साहेबांचा सिनेमा काढला म्हणून वेळ लागला. त्यातही अर्धा सिनेमा पाहून उद्धव ठाकरे निघून गेले. आता पार्ट २ येतोय, आता कळेल जे काय खरं खरं आहे ते या सिनेमामध्ये दिसेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याची वेळ आली तेव्हा दिघे साहेबांनी राज ठाकरे यांना पद द्या असं सुचवलं होतं. दिघे साहेबांना मानसिक त्रास झाला होता. दिघे साहेब गेल्यानंतर मी उद्दव ठाकरेंना भेटलो तेव्हा त्यांची संपत्ती कुठे आहे अशी विचारणा त्यांनी केली. तो फकीर माणूस, दोन हाताने सगळं वाटणार त्यांची काय संपत्ती असणार. मला त्यावेळी आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत असं वाटलं, पण नाईलाजाने काम करावं लागलं, अशी खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ठाणे मिळणार नाही असं तुम्हाला वाटत होतं. पण मी वरिष्ठ पातळीवर ठाणे आमची भावना, आनंद दिघेंच्या संवेदना आहेत. तो एक मतदरासंघ म्हणून महत्वाचा नाही असं सांगितलं होतं. मी मोठा कार्यक्रम केला तेव्हा मी माझं काम केलं असून आता तुम्ही तुमचं काम करा असं सांगितलं. नरेंद्र मोदी, अमित शाह ताकदीने पाठीशी उभे राहिले, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्यावरही टीकास्त्र डागले. ते म्हणाले, निवडणुकीच्या काळात राजन विचारे कार्यकर्त्यांना ना पैसे द्यायचा, ना वडापाव खाऊ घालायचा. तरीही मी सांगायचो म्हणून सगळे काम करायचे. आता राजनचा सीझन संपला, नरेशचा विजय आता पक्का आहे. पण संजय केळकरांची विनंती आहे की, नरेश तुला थोडं बदलावं लागेल, असे शिंदे यांनी म्हटले. ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी चिंता करु नका. मला काही जणांना तिकडे पाठवायचे आहे, काहीजणांना इकडे ठेवायचे आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.