‘चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर प्रहार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहिल्यानगरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेस आणि आघाडीवर जोरदार टीका केली. त्यांनी काँग्रेसच्या कार्यकाळावर आरोप केले. काँग्रेसने फक्त आपल्या नेत्यांचे खिशे भरले. आम्ही विकास आणि संरक्षण याच्यावर भर दिला. असं ही ते म्हणाले. इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता संपत आली आहे. देशात भाजप आणि एनडीएला लोकांचं मोठं पाठबळ मिळत आहे. भाजप आणि एनडीएचे मुद्दे काय आहेत तुम्हीच बघा. एनडीएचा मुद्दा विकास, गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, देशाचा सन्मान पण काँग्रेस या पैकी कोणत्याही मुद्द्यावर बोलते का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने आपला जाहीरनामा पूर्णपणे मुस्लिम बनवला आहे. काँग्रेसकडे बोलण्यासाठी काहीच मुद्दे राहिलेले नसून, ५० वर्ष काँग्रेसने फक्त गरिबी हटवण्याचे खोटी आश्वासन दिल्याचे मोदी म्हणाले. तुमचं एक मत थेट मोदींच्या खात्यात जाणार आहे. त्यामुळे विचार करून मतदान करा, असे आवाहन मोदींनी मतदारांना केले. देशात आणखीन विकास होणार असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचे सरकार अनेक योजना आणत असल्याचेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट निश्चित झाली आहे. महाराष्ट्राच्या विकासात अहिल्यानगर जिल्हा दिशा देणारा आहे. विखे पाटील यांचं मोठं योगदान आहे आज याची मला आठवण येत आहे. आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. भाजपा आणि एनडीएला भरपूर जन समर्थन मिळाले आहे. चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झाली. निवडणुकीआधी भानुमतीचा कुलाबा झाला होता तो मातीच्या किल्ल्यासारखा ढासळणार आहे. भारतीयांना संतुष्ट करण्याची ही निवडणूक आहे. इंडिया आघाडी आपल्याच लोकांच्या तूष्टीकरणांमध्ये लागली आहे.

‘काँग्रेस आणि इंडी आघाडी धोकादायक कट खेळतेय. इंडिया आघाडीच्या मोठ्या चेहऱ्याने हा कट उघड केलाय. चारा घोटाळ्यात जे दोषी आहेत ते म्हणत आहेत मुस्लिमांना देशात पूर्ण आरक्षण देणार. आता एससी, एसटी आणि ओबीसींकडे आरक्षण आहे. इंडी आघाडी म्हणतेय सगळ्यांचं आरक्षण काढून मुस्लिमांना देणार. संविधान धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ शकत नाही. हे लोक संविधान बदलवण्यासाठी निघाले आहेत,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.

‘मोदीने गेल्या दहा वर्षात सुरक्षा आणि विकास दोघांची गॅरंटी दिली आहे. काँग्रेसने सुरु केलेल्या समस्या आम्ही संपवल्या. येथे सुरु झालेल्या डॅमचे काम १९७० मध्ये सुरु झाले होते. आज त्याची किंमत करोडो रुपयांनी वाढली आहे. हे पाप काँग्रेसचे आहे. काँग्रेसने नेत्यांचा खिशा भरला. पण शेतकऱ्यांची जमीन कोरडी राहिली. देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला गती दिली. यामुळे नाशिक आणि अहिल्यानगरमधील शेकडो गावांना पाणी मिळणार आहे.’ असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अहिल्यानगरमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील विरूद्ध मविआचे निलेश लंके यांच्यात थेट लढत होत आहे. नुकतीच निलेश लंकेसाठी शरद पवारांनी प्रचार सभा घेतली होती. मात्र, त्या सभेच्या तुलनेत आजच्या मोदींच्या सभेला विराट जनसमुदाय उपस्थित होता. त्यामुळे सुजय विखेंच्या विरोधात मैदानात उतरलेल्या निलेश लंकेंच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. मोदींच्या सभेला झालेली गर्दी बघता लोखंडे आणि विखेंचा विजय निश्चित मानला जात आहे.