राजेंद्र गावित यांची घरवापसी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

महायुतीमध्ये पालघर लोकसभेची जागा भाजपला सुटली आणि या ठिकाणी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. भाजप किंवा शिवसेना कोणालाही पालघरची जागा मिळाली तरी उमेदवारी गावितांना मिळेल, असा अंदाज होता. मात्र, भाजपने हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली. यानंतर नाराज असलेल्या गावितांनी हेमंत सावरा यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी आज पुन्हा एकदा आपला मूळ पक्ष असलेल्या भाजपामध्ये प्रवेश केला.यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “२०१८ मध्ये पालघरच्या निवडणूकीमध्ये डॉ. राजेंद्र गावित हे भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ ला शिवसेना आणि भाजपची युती झाल्यावर शिवसेनेने पालघरची जागा मागितली होती. त्यावेळी आम्ही राजेंद्र गावित यांना शिवसेनेच्या जागेवर उभं राहण्याची विनंती केली होती. ते खासदार म्हणून निवडूनही आले होते. पुढे शिवसेनेतील स्थित्यंतरानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला.”

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार राजेंद्र गावित म्हणाले की, मी देवेद्रं फडणवीस आणि बावनकुळे यांचे आभार व्यक्त करतो. २०१८ ची निवडणूक चुरशीची झाली. उद्धव ठाकरेंनी तेव्हा मागणी केली होती की, पालघरची जागा आम्हांला पाहिजे. आता मी शिंदे गटातून खासदार म्हणून काम केलं आहे. आता फडणवीस यांच्याशी चर्चा केली. राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात. आज मी घरवापसी करत आहे. याचा आनंद होत असल्याचं म्हणत गावित यांनी मुख्यमंत्र्यांना देखील धन्यवाद व्यक्त केले आहेत.

राजेंद्र गावित २०१४ साली पालघरमधून भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये शिवसेनेसोबत भाजपाने युती केल्यानंतर शिवसेनेने पालघरची जागा उमेदवारासहित मागितली. त्यामुळे गावित पुन्हा एकदा शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता भाजपाने त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांचे योग्य ते पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गावितांचा आज भाजपामध्ये पुनर्प्रवेश पार पडला.