नाफेड, एनसीसीएफ ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार

केंद्र सरकारने ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने कांद्यावरील निर्यातबंद हटवली आहे. तसेच ५५० डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य ठेवण्यात आले आहे. यामुळे कांद्याची निर्यात करणं शक्य होणार असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे. आता एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक, पुणे, गुजरात, हरियाणा या ठिकाणी खरेदी केंद्र असणार आहेत.

कांदा निर्यातबंदी दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी लागू करण्यात आली होती. यामुळे शेतकरी आणि निर्यातदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अलीकडच्या काळात एनसीईएलच्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू करण्यात आली होती. मात्र त्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नवीन निर्णय घेतला आणि कांदा निर्यात खुली केली. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती एनसीसीएफचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी पिंपळगाव बसवंत येथे दिली.

नाफेडमार्फत अडीच लाख मेट्रिक टन, तर ‘एनसीसीएफ’मार्फत अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी नाशिक जिल्ह्यातील ५० विविध केंद्रांद्वारे केली जाणार आहे. डिजिटल पद्धतीने पेमेंटची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत ९५ टक्के कांद्याची खरेदी होणार आहे, तर उर्वरित ५ टक्के गुजरातमधून कांद्याची खरेदी होणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली.