देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील 11 जागा आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबादमध्ये जाऊन त्यांनी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं. निशान पब्लिक स्कूलमध्ये जाऊन नरेंद्र मोदींनी मतदान केलं. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मतदानाचं कर्तव्य पार पाडलं.
आजच्या तिसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील एकूण ९३ जागांवर मतदान होत आहे. खरंतप ९४ जागांवर आज मतदान होणार होते मात्र भारतीय जनता पक्षाने गुजरातच्या सुरतमध्ये बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होत आहे.तिसऱ्या टप्प्यात गोवामधील २, गुजरातच्या २५, छत्तीसगडच्या ७, कर्नाटकमधील १४, आसाममधील ४, बिहारच्या ५, मध्य प्रदेशातील ११, उत्तर प्रदेशातील १०, पश्चिम बंगालच्या ४, दादरा नगर हवेली आणि दमणच्या जागांवर मतदान होत आहे.
या टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
मतदानानंतर मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडून आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडा,असं आवाहन मोदींनी जनतेला केलं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनाही प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. ‘या उन्हात तुम्ही लोक रात्रंदिवस फेऱ्या मारत आहात. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी करावी. माध्यमांमध्ये सध्या बरीच स्पर्धा आहे. इकडे-तिकडे आधी धावावे लागते’ असे सांगत त्यांनी माध्यमकर्मींना उन्हात सांभाळून राहण्याचा आणि जास्तीत पाणी पिण्याचा सल्ला दिला.
