थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवण्याचा प्रयत्न; तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम कुमार असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. मुख्यमंत्र्यांचा ताफा रविवारी (५ मे २०२४) रात्री ठाण्याहून मुंबईला येत असताना ही घटना घडली. पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही तरुण थांबला नाही, त्यानं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग सुरूच ठेवला अखेर पोलिसांनी त्याला थांबवलं आणि चौकशी केली. त्यावेळी त्यानं आपण अभिनेता असल्याचं सांगितलं. वांद्रे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११:१५ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा वरळीच्या दिशेने जात होता. त्यावेळी एक कारचालक त्याची गाडी भरधाव चालवत लेन क्रमांक ७ मध्ये आला. याच मार्गिकेवरुन मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता. पोलिसांनी कार चालकाला त्वरीत लेन ६ मध्ये जाण्याचा इशारा केला. पण हा तरुण ऐकायला तयार नव्हता. त्याने कार बाजूला न घेता. पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. हा तरुण कार तशीच सूसाट दामटत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होता. कार ताफ्याच्या मागोमाग घुसवत तोदेखील वरळीच्या दिशेने जाऊ लागला.

पोलिसांनी वरळी वाहतूक विभागाच्या मदतीने त्याला थांबविले आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली जात आहे. वांद्रे-वरळी सी-लिंक येथे रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे कार घेऊन निघालेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाचे शुभमकुमार जगदीश कुमार असं नाव आहे. हा ३० वर्षांचा तरुण माउंट मेरी परिसर, वांद्रे पश्चिम येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.