सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका, दोघांचेही संचालकपद रद्द करण्याचे आदेश

गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. या दोघांचीही एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय, संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशिर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की सदावर्ते दाम्पत्यावर ओढावली आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी केली होती सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली होती.

सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळमध्ये एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अवहालाचं वाटप करण्यात आलं नव्हतं. अहवालावर नथुराम गोडसेचा फोटोही प्रिंट करण्यात आला होता, असा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता. वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना 14 दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणं आवश्यक होतं, पण अशी कोणतीही सूचना संचालक मंडळाकडून मिळाली नाही. तसंच आपल्या मर्जीतील सभासद बोलवून हवं त्या विषयांना मंजुरी दिल्याची तक्रार संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती.

एस टी बाहेरच्या लोकांना बँकेच्या सदस्यत्व देण्याचा ठरावही नामंजूर करण्यात आला आहे. या आणि अशा प्रकारच्या एकूण 13 बेकायदेशीर विषयांची तक्रार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार खात्याकडे केली होती.यातील बहूसंख्य विषयांना स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे सहकार खात्याने सदावर्ते दांपत्याला चांगलीच कायद्याची चपरास दिलेली आहे. यापुढे सदावर्ते यांचा कुठलाही संबंध आता एसटी बँकेशी राहणार नाही.

बँकेत बेकायदेशीररित्या कर्मचारी भरती सुरू आहे, या भरतीलाही सहकार खात्याने स्थगिती दिली आहे, पण असं असतानाही भरती सुरू आहे, असा आरोपही संदीप शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणाचीही तक्रार करण्यात आल्याचं संदीप शिंदे म्हणाले आहेत.