शरद पवारांना पक्ष चालवणं शक्य नसल्यानं ते आता विलिनीकरणाची भाषा बोलू लागलेत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असा दावा केला आहे. तसेच त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलिन करायचा की नाही याचा निर्णय निवडणुकीनंतरच घेऊ असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन होऊ शकतो हेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवारांना त्यांचा पक्ष चालवणं शक्य होणार नसल्यानं त्यांनी विलिनीकरणाचे संकेत दिले, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. धुळ्यातील शिरपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांना असं म्हणायचं असेल तर त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांच्या डोक्यात असेल की तो काँग्रेसमध्ये विलीन करावा. शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये गेले. आता त्यांनी हे संकेत दिले आहेत. त्यांचा पक्ष त्यांना चालवणं शक्य होणार नाही. त्यामुळे ते या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील.

उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीला प्रतिसाद मिळत आहे. आमच्यासाठी वातावरण अनुकूल आहे. आम्ही आठही जागा चांगल्या फरकाने जिंकणार आहोत. नंदुरबारमध्ये हिना गावित रेकॉर्ड मताने जिंकतील. धुळ्याला देखील सुभाष भामरे प्रचंड मतांनी विजयी होतील, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.