आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारांचा धडाका सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरे यांना विनंती केल्यानंतर त्यांची कणकवली येथे जाहीर सभा पार पडली. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत राणेंना निवडून आणण्याचं जाहीर आव्हान देखील केलं होतं. अशातच आता राज ठाकरे यांची पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी जाहीर सभा होत आहे.
यावेळी पुण्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मैदानात उतरवलं आहे. तर भाजपकडून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आली आहे. पुण्यात मनसेची साथ सोडत वंचितकडून उमेदवारी मिळवलेले वसंत मोरेही निवडणूक रिंगणात आहेत. अशा स्थितीत पुणे शहरात राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. येत्या 10 तारखेला मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. कणकवलीनंतर राज ठाकरेंची ही दुसरी सभा असणार आहे.
राज ठाकरे यांनी सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये नारायण राणेंसाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी नारायण राणेंना मतदान करण्याचे आवाहन केले. तर उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्लाबोल केला. कोकणातील धंदे गुजरातला पळवले जात आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंनी प्रकल्पाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.,”कोकणातले धंदे गुजरातला जात आहेत म्हणता. वा रे वा 2014 ते 2019 या काळात तुम्ही त्यांच्या सोबत होतात. तेव्हा त्यांना विरोध का केला नाही? कोकणात प्रकल्प आले तर स्फोट होईल म्हणणाऱ्या माहिती नाही का? की अॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबईत आहे. यांचा खासदार नाणारला विरोध करणार आणि लोकांना भडकवणार” असं राज ठाकरे म्हणाले होते. आता पुण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, याआधी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेस कोर्स वरती भव्य अशी सभा पार पडली. यावेळी पुणेकरांनी मोदींच्या सभेला भरभरून प्रतिसाद दिला. अशातच आता मोहाळांसाठी राज ठाकरे पुण्यात येत आहेत. त्यामुळे पुणेकर राज ठाकरेंच्या सभेला किती प्रतिसाद देणार. ते ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे . तर विरोधकांवर राज ठाकरे कशा पद्धतीने हल्लाबोल करणार ? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
