ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत कायम बेताल वक्तव्ये करीत असतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांना नेहमीच भाजपच्या नेत्यांचा रोष सहन करावा लागला आहे. त्यातच त्यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची दिली. याबाबत भाजपचे नेते संतापले आहेत. “संजय राऊत यांनी दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे”, अशी तक्रार भाजपने केली आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश भाजपने निवडणूक आयोगासह मुंबई पोलीस आयुक्तांना तक्रार केली आहे. तसेच अंबड पोलिस ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी तक्रार अर्ज दिला आहे. भाजप नेत्यांकडून अमरावती, मुंबई, बीडसह राज्यात विविध ठिकाणी संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.“पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानांवर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा श्री. राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे. अशा वक्तव्यांमुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे”, असा दावा भाजपने पत्रात केला आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यांनी हे पत्र पाठवलं आहे. यात म्हटले आहे की, अशा भडकाऊ विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते. या घटनेची सखोल चौकशी करून भविष्यात अशा भडकाऊ भाषणाची पुनरावृत्ती होणार नाही,याची काळजी घ्यावी.
अमरावती येथे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, प्रदेश सचिव जयंत डेहणकर, मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यांच्या वतीने ॲड.मनोज जैस्वाल यांनी, प्रदेश प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात , प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अशाच पद्धतीच्या तक्रारी केल्या आहेत .
