मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी तसेच पावसाळ्यात मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी 1 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली असल्याचा आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने काढला आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
जून व जुलै महिन्यात मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारीस बंदी घातल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठीही ही बंदी घालण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
या आदेशाचा भंग करून मासेमारी केल्यास, मच्छीमारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे. या कालावधीत यांत्रिक नौका मासेमारीस गेल्या असता अपघात झाल्यास त्यासंबंधीची कोणतीही नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार नाही, नौका पुनर्वसनासंबंधीचा प्रस्ताव विचारात घेण्यात येणार नाही, बंदी कालावधीत अपघाताने मच्छिमारांवर मृत्यू ओढवल्यास त्याच्या वारसांना कोणत्याही प्रकारची मदत अथवा अर्थसहाय्य शासनाकडून मंजूर केले जाणार नाही, शासनाच्या कोणत्याही अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही, बंदी कालावधीत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौका मालकांविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आला आहे.
