मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला भावेश भिंडे याला अखेर मुंबई पोलिसांनी काल बेड्या ठोकल्या होत्या.मुंबईतील घाटकोपर परिसरातील होर्डिंग दुर्घटना प्रकरणात मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली . या अनधिकृत होर्डिंगचा मालक असलेला भावेश भिंडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर 26 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर भावेश भिंडे हा उदयपूर येथे होता आणि तेथून मुंबई पोलिसांनी भावेशला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी भावेश भिंडे याच्याकडे दुर्घटनाग्रस्त होर्डिंगसोबतच इतर 3 ते 4 होर्डिंगची जबाबदारी होती. त्या प्रत्येक एका होर्डिंगचा खर्च 3 ते 4 कोटीचा असल्याची पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली. या प्रकरणात भावेशने होर्डिंगसाठी परवानग्या घेतल्या आहेत का? घेतल्या असतील तर त्याबाबत कुणाची मदत घेतली आहे? असे प्रश्न असून यातील आर्थिक व्यवहारही तपासणे गरजेचे असल्याचे सांगत पोलिसांनी आरोपीची कस्टडी मागितली. त्यानंतर न्यायालयने आरोपीला 26 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
या गुह्याचा तपास पंतनगर पोलिसांकडून क्राईम ब्रँच युनिट 7 कडे सोपवण्यात आला. आज भिंडेला पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. भिंडेचे किती ठिकाणी होर्डिंग लागले आहेत, जेथे दुर्घटना घडली, त्याचे स्ट्रक्चर ऑडिट कधी झाले होते याचा तपास केला जाणार आहे. तसेच होर्डिंगसाठी कधी, कोणाकडून आणि कशा प्रकारे परवानग्या घेतला होत्या, पंपनीत काही संचालकांची भूमिका काय होती, याचा तपास केला जाईल.
वर्षाला चार कोटी रेल्वे आयुक्तालयाला जायचे
इगो मिडियाच्या डायरेक्टरपदी जानवी म्हात्रे या होत्या. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर 22 नोव्हेंबर 2022 रोजी भावेश भिंडेची नियु्क्ती करण्यात आली असल्याचा आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. या होर्डिंगचे वर्षाला 4 कोटी रुपये हे रेल्वे पोलिस आयुक्तलयाला दिले जात असल्याची आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात माहिती दिली.
भावेश भिंडेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच तो फरार झाला. त्यानं लोणावळा गाठलं. तेथील बंगल्यात तो काही तास लपून होता. तिथून तो अहमदाबादला गेला. एका नातेवाईकाकडे थांबला. पोलीस मागावर असल्याची माहिती मिळताच भिंडेनं राजस्थानातील उदयपूर गाठलं. तिथे त्याच्या भाच्यानं रिसॉर्टमधील एक रुम बुक केली होती. भिंडेला इथूनच अटक करण्यात आली.
