तोतलाडोह धरणात पाणीच नसल्याने २०१९ मध्ये नागपूरकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अशी वेळ आली नसली तरी या धरणाचा जलस्तर उन्हाळ्यात कमी होतो. मात्र, यंदा एप्रिल आणि मे महिन्यात चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा आहे. नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोहमध्ये आजच्या स्थितीला ५० टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा १० टक्क्यांनी कमी असला तरी नागपूरची तहान भागणार असल्याने चिंता नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आलीकडे विदर्भात झालेल्या दमदार अवकाळी पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. तोतलाडोह धरणाची क्षमता १०१६ दशलक्ष घन मीटर आहे. जिल्ह्यातील पाच मोठ्या धरणांची स्थिती उन्हाळ्यातही चांगली असल्याची माहिती पुढे आली आहे. आज जलसाठा चांगला असल्याने एक दुष्काळ सहन करू शकेल, अशी एकंदरीत स्थिती नागपूरची आहे. तसेच आगामी पावसाळ्यात यात आणखी वाढ होईल, असे पेंच पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नागपूरपासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकजवळील पेंच नदीवर असलेल्या तोतलाडोह धरणात आता ५१५ दलघमी (दशलक्ष घनमीटर) जलसाठा आहे. तोतलाडोह हे जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील चौराई धरण बांधल्याने तोतलाडोह धरण भरणे कठीण झाले आहे. २०१९ मध्ये सुरुवातीला तोतलोडाह धरणात पाणीच नव्हते. त्यामुळे नागपूरकरांवर पाणीकपातीची वेळ आली होती. त्यानंतर अशी वेळ नागपूरवर आली नाही.
तोतलाडोह धरणात ऐन उन्हाळ्यात देखील ५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागपूरकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही, हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. मान्सून केरळात ३१मे ला दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाजही भारतीय हवामान विभागाने या आधीच वर्तवला आहे. गेल्या वेळी राज्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वत्र पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. अनेक मोठ्या धरणांचीही पाणीपातळी खालावली आहे. तर गावच्या टाक्यांमध्येही पाणी दिसेना झालं आहे. नळातून पाणी येण्यासाठी ८ ते १० दिवसांची वाट पाहावी लागत आहे. हे चित्र विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत बघायला मिळत आहे. असे असताना नागपूरकरांना काहीसा दिलासादायक बातमी समोर आली आहे.
नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह, खिंडसी आणि कामठी खैरी जलाशयातही सध्याच्या घडीला पुरेसा जलसाठा शिल्लक आहे. आजच्या तारखेत पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयात ५० टक्के इतका जलसाठा आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण ५९ टक्क्यांपर्यंत होते. नवेगाव खैरीमध्येही ९४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात या जलाशयात ७१ टक्के साठा होता. त्याचप्रमाणे इतर खिंडसी जलाशयात ६० टक्के, तर वडगाव जलाशयात ४५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
याच धरणाच्या उजव्या कालव्यातून नागपूर शहर आणि डाव्या कालव्यातून पारशिवनी, रामटेक, मौदा तालुका आणि भंडाऱ्या जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी सोडले जाते. तोतलाडोह धरणाची क्षमता १०१६ दशलक्ष घन मीटर आहे. जिल्ह्यातील पाच मोठ्या धरणांची स्थिती उन्हाळ्यातही चांगली आहे. आज जलसाठा चांगला असल्याने एक दुष्काळ सहन करू शकेल, अशी स्थिती नागपूरची आहे. पावसाळ्यात यात आणखी वाढ होईल, असे पेंच पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
