शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आलीय. दोन दिवसाआधी मान्सून रविवारी (१९ मे) अंदमानात दाखल झाला असून त्यानुसार यंदा वेळेपूर्वी मान्सून देशात दाखल होण्याची शक्यता आहे. ३१ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये आज सोमवार आणि उद्या मंगळवारी तुफान पावसाचा इशारा दिला आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागात देखील पाऊस होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. सध्या जळगावात तापमान वाढीने कहर केला असून यामुळे जळगावकर हैराण झाले असून यात पावसाचा अंदाज असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञ के एस होसळीकर यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार, असंही त्यांनी सांगितलं आहे. विशेष बाब म्हणजे, दरवर्षी मान्सून २२ मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होतो. यंदा ३ दिवस आधीच आला आहे. आयएमडीने नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने जसा अंदाज दिला होता, तसा मान्सून काल अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला आहे. आता त्याची वाटचाल केरळच्या दिशेने सुरू होणार आहे. साधारणता: अंदमानमधून येणारे नैऋत्य मोसमी वारे केरळपर्यंत पोहोचायला १० दिवस लागतात. दरम्यान, मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर मान्सून ३१ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल.
मध्य महाराष्ट्रात आज बहुतांश जिल्ह्यात मेघ गर्जना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. २१ व २२ मे रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली व सोलापूर मध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात आज व २१, २२ मे ला यलो अलर्ट घेण्यात आला आहे.
