विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली; उद्या बारावी बोर्डाचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाबद्दल अखेर घोषणा करण्यात आली आहे. उद्या बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहू शकणार आहेत. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. तसंच, सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ यादरम्यान बारावीच्या परीक्षा या पार पडल्या होत्या.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली, ज्यात एकूण ८ लाख २१ हजार ४५० मुले आणि ६ लाख ९२ हजार ४२४ मुलींचा समावेश आहे. विज्ञान शाखेतून सर्वाधिक ७ लाख ६० हजार ०४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. तर, कला आणि वाणिज्य शाखेतून अनुक्रमे ३ लाख ८१ हजार ९८२ आणि ३ लाख २९ हजार ९०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी महाराष्ट्र बारावीच्या परीक्षेत, कोकण जिल्ह्यात सर्वाधिक उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.०१ टक्के होते.

बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरत असते. बारावीच्या टक्केवारीनंतर पुढे कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा किंवा उच्च शिक्षणासाठी कोणती शाखा निवडायची, याबद्दल विद्यार्थी आणि पालकांची दिशा निश्चित होत असते. त्यामुळे बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. परिणामी बारावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व असते. त्यामुळे आता उद्या जाहीर होणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात काय समोर येणार, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

अधिकृत संकेतस्थळ

१. mahresult.nic.in

२. http://hscresult.mkcl.org

३. www.mahahsscboard.in

४. https://results.digilocker.gov.in

५. http://results.targetpublications.org

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.