पुणे अपघातप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये; कठोर कारवाईचे आदेश

पुण्यात प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलानं दोन आयटी अभियंत्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं. या वेदांत अग्रवालला अवघ्या काही तासात जामीन मिळाला. आरोपी अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पुण्यात उशिरापर्यंत सुरु असलेले बार आणि अमिर बापाच्या मुलाचा बेदरकारपणा आज दोघांच्या जिवावर बेतला. या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला पोर्शे गाडीतून बाहेर काढून चांगलाच चोप दिला होता.

अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा अशी मृतांची नावे आहेत. दोन्ही आयटी अभियंते मध्य प्रदेशातील असून ते सध्या पुण्यात राहत होते. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून त्याला न्यायालयाने काही तासांत जामीन मंजूर केला. कोर्टाने जामिनासाठी अशा अटी ठेवल्या आहेत की वाचून तुम्हाला धक्का बसेल. या प्रकारामुळे पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तांना फोन करुन आदेश दिले. या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार अल्पवयीन आरोपीच्या वडिलांविरोधात आणि बार मालकाविरोधात कलम 75 आणि 77 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे वडिलांविरोधात (विशाल अग्रवाल) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, बार मालकाने दारु सर्व्ह केल्यामुळे त्याच्या विरोधातही कारवाई केली जाणार आहे.

सदर मुलगा हा पुण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. तो दारुच्या नशेत कार चालवत होता आणि त्याने दोघांना उडवलं ज्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसंच त्याला जामीनही मिळाला होता. पुणे शहर पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणातला आरोपी अल्पवयीन आहे. त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्याच्याविरोधात मोटार वाहन कायद्यातील ज्या कलमांचं उल्लंघन झालं ती कलमंही लावण्यात आली असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं.