पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघाताने संपूर्ण शहरात खळबळ माजली. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या अपघाताला जबाबादर अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली, मात्र काही तासांतच त्याची जामीनावर सुटका झाली. आता याप्रकरणी आणखी मोठे अपडेट समोर आले आहे. या अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील , विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन होता. त्याने पोर्शे कारने दोघांना चिरडल्यानंतर पुण्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. यानंतर पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठाऊक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमनाच्या कलम 75 आणि 77 अंतर्गत आखणी एक गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे विशाल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या होत्या. यानंतर ते फरार झाले होते.
पुणे पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी अनेक पथकं तयार केली होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (21 मे) पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले आहे. विशाल अग्रवाल यांना दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. विशाल अग्रवाल यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.
दरम्यान ज्या पोर्शे कारने त्या दुचाकीस्वारांना धडक बसली ती कार नोंदणीविनाच रस्त्यावर धावत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आरटीओकडून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून ही कार पुण्यामध्ये आणण्यात आली होती. पुण्यातील आरटीओ कार्यालयात या कारची नोंदणी प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही.
