नाशिक लोकसभा मतदारसंघात आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. नाशिकमधून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र शांतीगिरी महाराजांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदान कक्षाला हार घातल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला नेत्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील ईव्हीएम कक्षाला हार घालून त्याची पूजा केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
आता या प्रकरणात शांतिगिरी महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शांतिगिरी महाराजांवर ईव्हीएम मशिनला हार घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईव्हीएम मशिनला हार घालून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्रंबकेश्वर पोलिसांकडून शांतिगिरी महाराज यांच्यावर निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांतिगिरी महाराजांना आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी हार घालून नमस्कार केला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप होत आहे.या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आहे. आपण ईव्हीएम मशिनला हार घातला नाही तर मशिनच्या बाहेर लावलेल्या भारत मातेच्या फोटोला हार घातल्याचे स्पष्टीकरण शांतिगिरी महाराज यांनी केले आहे. माझे हे कृत्य नियमांचे उल्लंघन आहे याची आपल्याला कल्पना नव्हती. नियम तोडण्याचा माझा उद्देश नव्हता.असं शांतिगिरी महाराज यांनी सांगितले.
