पुणे पोर्श अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालला पोलिसांनी कोर्टात हजर केलं. यानंतर सरकारी वकीलांकडून युक्तीवाद करण्यात आला. पुढील तपासासाठी वकिलांकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली, पण कोर्टाने 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली. मुलगा अल्पवयीन असून त्याच्याकडे वाहन चालवण्याचं लायसन्स नाही, हे माहिती असतानाही मुलाला कार चालवायला दिल्याचा ठपका विशाल अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आलाय.अगरवाल याच्यासह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांची सुद्धा कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
“वेदांतला त्याचे वडील विशांत अग्रवाल यांनी पार्टीला परवानगी दिली होती. विशालने वेदांतला परवाना नसताना गाडी चालवायला दिली”, असं पोलिसांनी युक्तिवादात म्हटलं आहे. “जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा विशाल अग्रवाल पुण्यात होता. मात्र विशाल अग्रवाल पुण्यात नसून बाहेर असल्याचं सांगण्यात आलं. फरार विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगरला सापडला”, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली.
अल्पवयीन मुलाला आज सज्ञान ठरविल्यास त्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात येणार आहे. बाल हक्क न्यायालयात हजर राहण्याकरिता अल्पवयीन मुलाला नोटीस बजाविण्यात आली आहे. त्याच्या पालकानांही आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अल्पवयीन मुलगा न्यायालयात हजर झाला आहे. दुसरीकडं पुणे महानगरपालिकेनं अनधिकृत पब बुलडोझरनं पाडण्याची कारवाई सुरू केली आहे.
पोर्शे कार अपघातात अल्पवयीन आरोपीला पहिल्याच दिवशी अटक केली होती आणि त्यानंतर बाल न्याय बोर्डाने त्याला शिक्षा सुनावली होती. ज्यामध्ये ‘अपघात’या विषयावर 300 शब्दाचा निबंध, वाहतूक पोलिसांसोबत 15 दिवस काम अशी शिक्षा देण्यात आली होती. या निकालाचा पोलिसांनाही धक्का बसला असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
विशाल अग्रवाल याच्यावर शाई फेक
पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील व्यापारी विशाल अग्रवाल याच्यावर शाई फेकल्याची घटना समोर आली आहे. घटनेच्या वेळी पोलीस विशालला न्यायालयात हजर राहण्यासाठी घेऊन जात होते. दरम्यान, एका संघटनेशी संबंधित काही कामगार तेथे आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या कामगारांच्या हातात संघटनेशी संबंधित झेंडाही होता. दुपारी विशाल अग्रवालला सत्र न्यायालयात नेण्यासाठी पोलीस निघाले असता, वाटेत एका संघटनेशी संबंधित लोकांनी विशालवर शाई फेकली. कामगारांनी गोंधळ घातला आणि पोलिस व्हॅन रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले. त्यानंतर पोलिस व्हॅन पुढे निघाली.
