पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. निबंध लिहिणे हाच नियम असेल तर ट्रक, बस. उबर, ओला, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालकाने अपघात केला तर त्याला तुम्ही निबंध लिहायला का लावत नाही? असे ते म्हणाले होते. दरम्यान, राहुल गांधीच्या या टीकेला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.
“या घटनेचे राजकारण करण्याचा हा चुकीचा प्रकार आहे. कारण पुण्यातील घटनेत पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या प्रकरणी बाल न्याय मंडळाने दिलेल्या निर्णयावरही आम्ही आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र पोलिसांनी त्याविरोधात अपील दाखल केले आहे. अल्पवयीन मुलाला दारू पाजणाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच गाडी देणाऱ्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. राहुल गांधींनी प्रत्येक गोष्टीत मतांचे राजकारण आणण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे. मी त्याचा निषेध करतो. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं योग्य नाही,” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
पुण्यातील अपघातावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. त्यांनी एक्स या समाज माध्यमावर व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती.“बस चालक असो, ट्रकचालक, ओला, उबर, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालक असो, यांच्यापैकी कुठल्याही चालकाने चुकून एखादा अपघात केला, त्या अपघातात कोणाचा बळी गेला तर त्या चालकाला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होते. त्यांच्या वाहनाची चावी घेऊन ती फेकून दिली जाते. परंतु, त्यांच्याजागी एखादा श्रीमंतांच्या घरातला १७ वर्षांचा मुलगा असेल, जो दारू पिऊन पोर्शसारख्या कंपनीची महागडी कार चालवत असेल आणि त्याने एखादा अपघात केला, त्यात दोन जणांची हत्या केली तर त्याला काय शिक्षा होते? त्याला केवळ निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली जाते”, असं राहुल गांधी म्हणाले होते.
पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आज सत्र न्यायालायत सुनावणी पार पडली. यावेळी पुणे पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांच्यासह तीन आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशाल अग्रवालसह तिघांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवाल यांच्यसह बार चालक जितेश शेवनी आणि जयेश बोनकर या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
