‘१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले’; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका केली होती. “माझ्यावर अण्णा हजारे आणि बीएमसीचे माजी अधिकारी जी आर खैरनार यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले होते, मात्र आता या दोघांचा कुठे थांगपत्ता नाही”, असं म्हणत शरद पवारांनी आण्णा हजारेंना डिवचलं होतं. दरम्यान शरद पवारांच्या टीकेला आता आण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“दहा, बारा वर्षे झालीत त्यांना आता कशी जाग आली मला माहित नाही, त्यांचे मी बारा वर्षापूर्वी काही मंत्री घरी पाठवले. बारा वर्षानंतर त्यांना आता जाग आली, एक तप गेले. शरद पवार यांचे नातलग पद्मसिंह पाटील त्यांचे मी ज्यावेळी पुरावे काढले तेव्हा राजीनामा द्यावा लागला, असं प्रत्युत्तर आण्णा हजारे यांनी शरद पवार यांना दिले. समाजाच्या हितासाठी पुरावे बाहेर काढणे दोष आहे का? म्हणून मी जिथे जिथे दिसले तिथे बोलत गेलो, असंही अण्णा हजारे म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनाही टोला लगावला. “शरद पवार यांच्या पक्षातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मध्यंतरी माझ्यावर टीका केली होती. मात्र, प्रत्येक पक्षात हे समविचारी माणसं असतात, तसेच शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड हे समविचारी लोक आहेत, ते एकत्र राहणारच”, असं अण्णा हजारे म्हणाले.

मतदान करताना उमेदवार आचारशील, विचारशील, निष्कलंक जीवन, अपमन सहन करण्याची शक्ती असणारा निवडा. तो दिव्यासारखा झटत राहिला पाहिजे. मतदाराना ज्यांना मतदान करायचे त्याचे चारित्र्य कसे आहे? त्याचे आचार- विचार कसे आहे? त्याचे जीवन निष्कलंक आहे का? दाग लागलेले आहे का? हे पाहिले पाहिजे. खरी लोकशाही आणायची असेल तर मतदारांची जबाबादारी महत्त्वाची आहे, असे अण्णा हजारेंनी म्हटलं होतं.