डोंबिवली पूर्वच्या सोनारपाडा येथील एका केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. आगीचे प्रचंड लोळ दूरवरून दिसत असल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. गुरुवारीदुपारी१ वाजून ४० मिनिटांनी ही आग लागली. अंबर केमिकल कंपनी,मेट्रो कंपनी जवळ,एम.आय.डी.सी. फेज- ०२, सोनारपाडा,डोंबिवली (पूर्व) या कंपनीत हा स्फोट झाल्यानंतर भीषण आह लागली.
या स्फोटाने ३ ते ४ किलोमीटर परिसरातील इमारतींचे नुकसान झाले असून अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. या दुर्घटनेनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, डोंबिवलीतील केमिकल कंपन्या दुसरीकडे स्थलांतरित केल्या जातील.
दुर्घटनेतील सर्व जखमींचा खर्च सरकार उचलणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसं जाहीर केलं आहे. मात्र घटना दुर्दैवी आहे. या कंपन्यांमध्ये नियमबाह्य काही झालं आहे का? याची तपासणी करण्याच्या स्पष्ट सूचना अग्निशमन दलाला दिल्या आहेत. तसंच या घटनेची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. यात कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
डोंबिवली परिसरातील सर्व धोकादायक कंपन्या शिफ्ट करण्यात येणार आहेत. वर्षभर यावर काम सुरू आहे. जागा शोधण्यात आली आहे, मात्र अद्याप जागेचं वाटप करण्यात आलेलं नाही. ४ तारखेनंतर जागेचं वाटप होईल. कंपन्या शिफ्ट करण्याच्या डोंबिवलीकरांच्या मागणीवर धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यासाठी अंबरनाथ परिसरात शेकडो एकर जागा घेण्यात आली आल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.
डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत सुरुवातीला भीषण स्फोट झाला. त्यानंतर ही आग आजूबाजूला असलेल्या कंपन्यांमध्ये पसरत गेली. यात मेहता पेंट, के.जी.एन केमिकल, सप्त वर्ण, हुंडाई शो रूम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यावेळी हुंडाई शो रुममधील 10 ते 12 गाड्याही जळून खाक झाल्या.
