डोंबिवली एमआयडीसी दुर्घटनाप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता वाढला आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरुच आहे. या दरम्यान आज सकाळी उद्धवस्त अवशेषांमध्ये आणखी तीन मृतदेह सापडले आहेत. अग्निशमन विभागाने हे मृतदेह एनडीआरएफच्या ताब्यात दिले. या दुर्घटनेतील मयतांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.

एमआयडीसीमधील अमुदान कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा स्फोट होऊन भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाचे हादरे दोन ते किलोमीटरच्या परिसरात बसले होते. त्यामुळे या परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या होत्या. बॉयलरचे तुकडे दीड किलोमीटर लांबच्या अंतरावर फेकले केले होते. हे तुकडे चारचाकी वाहनांवर पडून कोसळून त्यांचेही नुकसान झाले होते.

दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे ती म्हणजे अमुदान या कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल दुपारी झालेल्या बॉयलरच्या स्फोटामुळे भीषण आग लागून दुर्घटना घडली.

धोकादायक कंपन्या डोंबिवलतून हलवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या भागात अतिधोकादायक कंपन्या आहेत. रेड कॅटगरीमधील या कंपन्या आहेत. या कंपन्यांची एबीसी अशा कॅटगरी करण्याचे आदेश दिले आहेत. इंडस्ट्रीयल सेफी युनिटला अधिक धोकादायक कंपन्या तातडीने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धोकादायक कंपन्यांचे इंजिनिअरिंग, आयटी या क्षेत्रात रुपयांतरीत करता येईल. जिवितेला धोका असणारे उद्योग शहराबाहेर हलविण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.