दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा; राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे मागणी

राज्याच्या अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती असून राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असताना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली आहे.तशी अनुमती दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

राज्याला उन्हाच्या झळा बसत असून, दुष्काळाच्या मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. दुष्काळी उपाययोजना तसेच रुग्णालयीन सुविधा, रस्त्यांची कामे, महापालिका आणि गावपातळीवरची कामे यांनाही मंजुरी मिळण्याची गरज असताना आचारसंहिता आडवी येत आहे. या पार्श्वभूमीवर, आचारसंहिता शिथिल करण्याची गरज आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका झाल्या आहेत. आचारसंहिता लागू झाल्यास राज्य सरकारने दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये केलेल्या उपाययोजनांना गती मिळू शकेल, असा विश्वास सरकारला आहे. यावर निवडणूक आयोग आज निर्णय घेऊ शकतो. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी नगर येथे दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत दुष्काळग्रस्त मराठवाड्याची परिस्थिती आणि पाणी प्रश्नावर चर्चा होणार आहे. तातडीने मदत देण्याचे नियोजन केले जाईल. जनावरांना चारा पुरवठा करण्याबाबतही चर्चा होणार आहे.या बैठकीला सर्व जिल्हाधिकारी, सर्व पालकमंत्री, कृषी अधिकारी महावितरणचे अधिकारी यासह अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणूक आचारसंहिता शिथील झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळणार आहे. आज निवडणूक आयोगाकडून याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणुक आचारसंहिता शिथील झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळणार आहे.