पुणे हिट अँड रन प्रकरणावर अखेर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटनेनंतर अजित पवार माध्यमांसमोर आले नव्हते. अजित पवारांनी आज अखेर पुण्यात टायटन घड्याळच्या शोरुमच्या उद्घाटनाला उपस्थिती लावली. यावेळी अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणाकडे आपलं बारकाईने लक्ष आहे. घटना समजल्यापासून पहिल्या दिवसापासून या घटनेकडे आपलं लक्ष आहे. तसेच या प्रकरणावर आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा देखील केल्याची माहिती अजित पवारांनी दिली. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
“पुण्यातील घटनेवर मी लक्ष ठेऊन आहे. माझं यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांनी याप्रकरणात बारकाईने लक्ष घातलं आहे. खरं तर कारण नसताना असा प्रकाराच गैरसमज केला जातो की यात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही. मुळात मी माझं काम करत असतो, मला माध्यमांच्या पुढे यायला आवडत नाही. २१ तारखेला ही घटना घडली तेव्हा मंत्रालयात होतो की नाही, हे कोणीही जाऊन बघू शकतो”, परंतु माझ्याविषयी गैरसमज पसरवला जात आहे. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
यावेळी अजित पवार म्हणाले की, राजकीय हस्तक्षेप होऊ न देता प्रकरण गंभीर असल्याचे अजित पवार म्हणाले. संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. त्यांनी सांगितले की मला या प्रकरणांमध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त माहिती देत होते.ते पुढे म्हणाले की अग्रवाल प्रकरणात जामीन कोणत्या पद्धतीने मिळाला हे पाहिलं आहे, त्यामुळे कडक भूमिका घेतली आहे आणि या प्रकरणांमध्ये पारदर्शक ठेवली आहे.
मी आजही सकाळी पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यांनी प्रत्येक मिनिटं-मिनिटं काय-काय घडलं याविषयी सांगितलं. अल्पवयीन आरोपीला बेल कशी मिळाली? हे देखील तुम्हाला समजलं आहे. त्याबाबत वेगवेगळ्या बातम्या आल्या. न्यायालयाने बेल का द्यावी हा न्यायालयाचा प्रश्न आहे. या प्रकरणी ज्या गोष्टी कडक घेतल्या जायला हव्यात तशा कडक घेतल्या गेल्या आहेत”, असं अजित पवारांनी सांगितलं.
