विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी फास आवळला; आणखी दोन गुन्हे दाखल

पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 19 मे च्या पहाटे विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने कल्याणीनगर परिसरात मद्य पिऊन भरधाव वेगाने पोर्शे कार चालवून दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात पोलिसांनी विशाल अग्रवाल यांना अटक केली आहे.

अल्पवयीन मुलाच्या वडिलांची आणि आजोबांची चौकशी करण्यात येत आहे. यात विशाल अग्रवालवर आता दोन गुन्हे नव्यानं दाखल करण्यात येणार आहे. त्यात पुरावा नष्ट केल्याचा आणि खोटी माहिती दिल्याने हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात विशाल अग्रवालच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही यापूर्वी जुवेनाईल अॅक्टनुसार 75 आणि 77 कायद्याअंतर्गत लहान मुलाच्या हाती गाडी दिल्याचे गुन्हे दाखल केले. मात्र त्यानंतर आता कोर्टाला खोटी माहिती दिल्याचं समोर आल्यानंतर अग्रवालवर पुन्हा नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला तू कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग, असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितलं होतं. तसेच अल्पवयीन मुलानेही मी कार चालवत नव्हतो, तर ड्रायव्हर कार चालवत होता, असे जबाबात म्हटले होते. याशिवाय त्याच कारमध्ये असणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या दोन मित्रांनीही असाचा दावा केला होता. या दाव्यात तथ्य नसल्याने पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यावर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 201 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्दलही कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलाच्या वडिलांची आणि आजोबांची चौकशी करण्यात आली त्यावेळी देखील दोघांच्या जबाबात तफावत आढळली होती. त्यानंतर आज ड्रायव्हर असलेल्या गंगाराम पुजारीने भलतीच कबुली दिली. ज्यामुळे आणखी विशाल अग्रवाल गोत्यात आला. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही याबाबत खुलासा केला. ते म्हणाले, या संपूर्ण प्रकरणात ड्रायव्हरची भूमिका महत्त्वाची आहे. अग्रवाल यांच्या घरच्या सेक्युरिटीने त्याच्या रजिस्टरमध्ये अग्रवाल यांचा मुलगाच गाडी घेऊन गेल्याची नोंद आहे. मुलगा गाडी चालवत असल्याचं आढळून आलं आहे. अपघात झाल्यानंतर त्यांनी ड्रायव्हर बदलल्याची बाबही समोर आली आहे. पुरावा नष्ट करण्याचा, त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रकार समोर आला आहे. ड्रायव्हर कार चालवत असल्याचा बनाव करण्यात आला होता. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अग्रवाल याच्यावर कलम 201 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.