पुणे अपघात प्रकरणात ल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक

पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्पवयीन आरोपी बाल सुधारगृहात आहे. तर दुसरीकडे त्याचे वडिल विशाल अग्रवालला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर आता याप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आणखी एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन कार चालकाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवार यांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. तसेच अग्रवाल कुटुंबाविरोधात विरोधात तक्रारी असल्याचे संपर्क साधा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात यापूर्वीच अटक झाली होती. आता विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांनाही गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुण्यातील अपघात प्रकरणात ही सातवी अटक आहे. चालकाला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आधी पुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी केली होती. तसेच विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची समोरासमोर चौकशी झाली होती.

या प्रकरणी विशाल अग्रवालवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरेंद्र कुमार आणि विशाल या दोघांनी मिळून ड्रायव्हर गंगाराम पुजारीला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोप आहे. सुरेंद्र कुमार अग्रवालला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तर काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या विशाल अग्रवालचा पुन्हा पुणे पोलिस ताबा घेणार आहेत.

अपघात झाल्यानंतर चालक दोन दिवस बेपत्ता होता. कारण अपघातानंतर सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी चालकाचे अपहरण करत डांबून ठेवले होते. बंगला देतो असे अमिष दाखवत अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. त्या चालकाचे मोबाईल फोन काढून घेत दोन दिवस डांबून ठेवले होते. त्यानंतर चालकाने कसातरी पत्नीला फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. चालकाच्या पत्नीने पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी संबंधित चालकाची सुटका करत सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.