लातूर पॅटर्नचा दबदबा कायम; यंदा 123 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. दरम्यान, यंदा एकाच जिल्ह्यात 123 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. राज्यात 100 टक्के गुण घेणारे विद्यार्थी 187 आहेत. त्यापैकी 123 विद्यार्थी हे लातूर विभागातील आहेत. राज्यात सर्वात जास्त पैकीच्या पैकी गुण घेण्याचा हा लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो. याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदाही लातूर पॅटर्नचा डंका कायम आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. यंदा दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी नोंदणी वाढली होती. नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. एकूण १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोकण विभागाने निकालाने बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९४.७३ टक्के लागला. निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९४.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली असून, ९७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी ९३.८३ टक्के निकाल लागला होता. त्यामुळे यंदा निकाल वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

लातूर विभागीय मंडळात नांदेड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असून याठिकाणी 95.27 टक्के निकाल लागला आहे. या विभागातून 1 लाख 5 हजार 789 विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. मंडळाकडून 408 केंद्रावर घेण्यात आलेल्या परीक्षेला 1 लाख 4 हजार 503 विद्यार्थी सामोरे गेले होते. यातील एकूण 99 हजार 570 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्याचा 96.46, धाराशिव 95.88 आणि नांदेड जिल्ह्याचा 93.99 टक्के निकाल लागला आहे. विशेष म्हणजे राज्यातील 183 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले असून यात लातूर विभागाच्या 123 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्यावर्षीही राज्यातील 151 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले होते. यात 108 विद्यार्थी लातूर मंडळाचे होते. त्यामुळे 100 टक्के गुण मिळवून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लातूर पॅटर्नचा दबदबा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रत्यक्ष मार्कशीट हातात येण्यासाठी विद्यार्थ्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. पहिल्यांदाच दहावीचा निकाल हा मे महिन्यात लागल्याचे बोर्डाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. आता ही परंपरा कायम ठेऊ असेही त्यांनी म्हटले. जवळपास सर्वच विभागांचा दहावीचा निकाल चांगलाच लागलाय.