महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधरसाठी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निरंजन डावखरे विधानपरिषद आमदार आहेत. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी तिसऱ्या टर्मसाठी त्यांचं तिकीट फिक्स मानलं जात होतं. अशातच भाजपच्या मतदारसंघात मनसेने उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे आता भाजप डावखरेंचं तिकीट कापणार, की कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे, तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वीच अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी यापूर्वीच जाहीर झाली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने पत्रक काढून या नावांची घोषणा केली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या नेत्यांमध्ये अनिल परब यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. ते उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते आहेत. सध्या परब हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे विधानपरिषदेमध्ये प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये परब यांनी परिवहन मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच ते रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्रीही होते. परब यांना 2012 ते 2018 या कार्यकाळासाठी विधानपरिषदेवर संधी देण्यात आलेली. आता पुन्हा पदवीधरच्या माध्यमातून परबांवर ठाकरेंनी विश्वास टाकला आहे.
मनसे नेते अभिजीत पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत. 2014 मध्ये पानसेंनी दिग्दर्शित केलेल्या रेगे चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाची निर्मिती खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावेळी बाळासाहेबांचं आयुष्य रुपेरी पडद्यावर साकार करण्यासाठी संजय राऊतांनी अभिजीत पानसेंची निवड केली. अभिजीत पानसे दिग्दर्शित ठाकरे सिनेमा महाराष्ट्रासह देश-विदेशात प्रचंड गाजला. शिवसेनेत असताना भारतीय विद्यर्थी सेनेची धुरा अभिजीत पानसे यांच्या खांद्यावर होती. मात्र, नंतर आदित्य ठाकरेंच्या लॉन्चिंगसाठी बाळासाहेबांकडून युवासेना स्थापन करण्यात आली आणि शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचं विलीनीकरण युवासेनेत झालं. मग नाराज पानसे यांनी मनसेची साथ देण्याचा निर्णय घेतला. अभिजित पानसे सिनेमाव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय असतात. पानसे यांनी मनसेच्या चित्रपट सेनेची जबाबदारी सांभाळलेली आहे. राज ठाकरेंच्या निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. अभिजीत पानसे यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूकही लढवली होती.
